Tuesday, 31 December 2024

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


जालना, दि.31 (जिमाका) :- राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शनिवार दि.11 जानेवारी 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि.11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.55 वाजता वाहनाने ज्ञान संजिवनी कॅम्पस राजपुतवाडी, जालना येथे आगमन होईल. सकाळी 9 ते 10.45 वाजेपर्यंत ‘महाचिंतामणी’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 10.45 वाजता वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 


 

जालना, दि.31 (जिमाका) :- मुंबई महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून दि.3 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीत जालना येथे उद्योजकांसाठी पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा नि:शुल्क असून कार्यशाळेमध्ये तज्ञाद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी उद्योग आधार, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत ठेवावी. अधिक माहितीसाठी दिलीप शिलवंत मो.8087283065 यांच्याशी किंवा दुरध्वनी  क्र. 02482 220592 यावर संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-


Monday, 30 December 2024

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 


जालना, दि.30 (जिमाका) :- जिल्हा युवा पुरस्कार हा युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांच्या कार्याचे,  योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा युवा पुरस्कार जिल्ह्यातील 1 युवक व 1 युवतींना रोख रक्कमेसह गौरवपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येते. मागील पाच वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी विहीत नमुन्यातील अर्जासह आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह शुक्रवार दि.10 जानेवारी 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रॅस्ट ॲक्ट  1950 नुसार पंजीबध्द असाव्यात. संस्थेसाठी रोख रक्कम, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  वर्ष 2019-20 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2018 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2020 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. वर्ष 2020-21 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2019 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2021 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. वर्ष 2021-22 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2020 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2022 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. वर्ष 2022-23 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 01 एप्रिल 2021 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2023 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2023-24 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2022 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2024 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथून अथवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा.  असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.30 (जिमाका) :-  जिल्ह्यातील  गुणवंत क्रीडापट्टू,  गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे,  योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. तरी जालना जिल्ह्यातील पात्र असलेल्या क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंनी पुरस्कारासाठी परिपुर्ण अर्ज शुक्रवार दि.10 जानेवारी 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी केले आहे.

जिल्ह्यातील  1 गुणवंत क्रीडा मार्गदर्शक तसेच गुणवंत खेळाडू यामध्ये 1 पुरूष, 1 महिला आणि 1 दिव्यांग खेळाडू  असे एकुण 4 पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये वर्ष 2023-24 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी दि. 1 जुलै 2022 ते 30 जून 2023 या कालावधीसाठी प्रत्येक वर्षाच्या खेळाडूसाठी मागील पाच वर्षाची कामगिरी व क्रीडा मार्गदर्शकासाठी मागील दहा वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल.

 खेळाडूंने पुरस्कार  वर्षासह लगतपुर्व पाच वर्षापैकी दोन वर्षे त्या जिल्ह्याच्या मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. तर  क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्र राज्यात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असले पाहिजे व त्याने पुरस्कार वितरीत करण्यात येणाऱ्या वर्षात वयाची 35 वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केलेले असले पाहिजे.

क्रीडा मार्गदर्शकासाठी गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदत विजेते तसेच कनिष्ठ शालेय मधील राज्य ते राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक अर्ज करण्यास पात्र राहतील. सांघिक अथवा वैयक्तिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य / जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक विहित नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तीकरित्या मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

6 जानेवारीला लोकशाही दिनाचे आयोजन

 


जालना, दि.30 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही  दिनाचे  महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजन करण्यात येते.   तरी जालना येथील   जिल्हाधिकारी कार्यालयात   जिल्हास्तरीय  लोकशाही   दि   सोमवार  दि. 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आयोजित  करण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी  नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

              लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा.  लोकशाही  दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे,  राजस्व,  अपील,  सेवाविषयक,  आस्थापनाविषयक बाबी,   विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.   तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना  https://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 


जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

Friday, 27 December 2024

निवासी सोलर पॅनल दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 


 

जालना, दि.27 (जिमाका) :- पुणे येथील महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व महाराष्ट्र उ‌द्योजकता विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील "अमृत" संस्थेच्या लक्षीत गटातील उमेदवारांसाठी मोफत सोलर पॅनल इंस्टॉलेशनवर आधारीत निवासी तांत्रिक उ‌द्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे दि.7 ते 24 जानेवारी 2025 या अठरा दिवसाच्या कालावधीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांना तांत्रिक व उ‌द्योजकीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सध्या ऊर्जेचा तुटवडा भासत असल्यामुळे शासनाचे धोरण सोलर ऊर्जा निर्मितीला प्राधान्य देण्याचे आहे. त्यामुळे सोलर ऊर्जा निर्मिती साठी शासनाच्या वतीने सबसिडीच्या दरामध्ये शेतकरी तसेच लाभार्थ्यांना सोलर पॅनल देण्यात येत आहेत. परंतु सदरील पॅनल इन्स्टॉलेशन मेंटेनन्स, दुरुस्ती करणारे मनुष्यबळ जालना जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार व उ‌द्योग करण्याची संधी या प्रशिक्षणा‌द्वारे उपलब्ध होणार असून प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींची निवड प्रत्यक्ष मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. तसेच जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षण हे खुल्या प्रवर्गातील "अमृत" लक्षित गटातील उमेदवारांसाठी म्हणजे (ब्राह्मण बनिया, वत्स, कम्मा, कायस्त, नायर, एयांगर, पाटीदार, बंगाली, पटेल, मारवाडी, यलमार, त्यागी, ठाकूर, मारवाडी, सेनगुनथर, सिंधी, राजपुरोहित, नायडू, यलमार ) इत्यादी प्रवर्गातील लाभार्थीना सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे सहभागी होता येईल.

प्रवेशासाठी पात्रता शिक्षण किमान बारावी पास, पदवीधर व तांत्रिक पदवीधारकास प्राधान्य असून वयोमर्यादा 21 ते 50 वर्ष आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांना प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्जासोबत शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका,  शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, तहसीलचे अधिवास प्रमाणपत्र, जातीचा उल्लेख असलेल्या कोणत्याही शासकीय कागदपत्राचा पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्याचे तहसील उत्पन्न दाखला, विवाहित असल्यास महिलांसाठी गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड आदि  प्रवेश अर्जासोबत छायांकित प्रतिमध्ये जोडणे आवश्यक आहे.  www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर आपला अर्ज अपलोड करून, अर्जाची हार्ड कॉपी व अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्य छायांकित प्रती जोडून जिल्ह्यातील जिल्हा प्रकल्प अधिकारी या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये सादर करण्याची अंतिम दि. 1 जानेवारी 2025 आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित जिल्ह्याच्या प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उ‌द्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी), द्वारा मराठा पार्क बिल्डींग विशाल कॉनर छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना फोन नं. ०२४८२- २२०५९२ या ठिकाणी संपर्क साधावा व आपला प्रवेश अर्ज सादर करावा,  असे आवाहन प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उ‌द्योजकता विकास केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-

 

नवीन दुग्ध व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना आवाहन

 


जालना, दि.27 (जिमाका) :- केंद्र शासनामार्फत (सहकार से समृध्दी) अंतर्गत देशभरात 54 उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत असून त्यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आणि महिलांना समाविष्ट करुन दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थामार्फत समृध्द करणे हा उद्देश निश्चित करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत एनडीडीबी व राज्य शासनामार्फत राज्यात सन 2024-25 या कालावधीत 5 हजार 56 नवीन दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था नोंदणी करण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे. तरी जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त दुग्ध सहकारी संस्थांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन उत्साहात

 


 

        जालना, दि.27 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जालना येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र राठी यांच्या हस्ते झाले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य श्रीमती शेळके, प्रसिद्ध उद्योजक घनश्याम गोयल, लघुउद्योग भारती संघटनेचे अध्यक्ष सतीश भक्कड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर, प्राचार्य राजेश धानोरकर, प्राचार्य डी.एम.राठोड,  प्राचार्य एम .. के. शेख,  जिल्ह्यातील सर्व आयटीआयचे गटनिर्देशक, शिल्पनिर्देशक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आठ शासकीय तरका अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने आपला सहभाग नोंदवून 59 प्रकल्प प्रदर्शनासाठी आणले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी जालनातील विविध शाळेतील विद्यार्थी आले होते. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व प्राचार्य यांच्या हस्ते पहिल्या दहा विजेत्यांना बक्षीस वितरण केले. लॉजिक गेट सिम्युलेटर अँड इलेक्ट्रिकल फॉल्ट सिम्युलेटर आयटीआय जालना, वन मिनिट सारी आयटीआय परतुर, ऑटोमॅटिक कंट्रोल रूम आयटीआय बदनापूर, सीड सोयलिंग मशीन आयटीआय जालना, पार्टी वेअर सारी आयटीआय भोकरदन, पावर जनरेशन ऑटो स्ट्रीट लाईट आयटीआय जाफराबाद, थीन रिंग्स विथ मेटल बार बेंडर आयटीआय मंठा, 33- केवी इलेक्ट्रिक सब स्टेशन आयटीआय घनसावंगी, अग्निशामक नियंत्रण उपकरण आयटीआय अंकुशनगर, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट आयटीआय जालना यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोरे यांनी केले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनात संस्थेतील प्राचार्य, गटनिर्देशक सर्व शिल्प निर्देशक व कार्यालयांनी कर्मचारी व भंडार कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे प्राचार्य, हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

 

Thursday, 26 December 2024

जालना जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहिर

 


           जालना,दि.24(जिमाका) : जिल्हाधिकारी  यांनी कॅलेंडर वर्ष 2025 करिता जालना जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहिर केल्या असुन त्या पुढील प्रमाणे आहे.

       बुधवार दि. 8 जानेवारी 2024 रोजी राजाबाग सवार दर्गा उत्सव, सोमवार 29 सप्टेंबर 2025 रोजी मस्त्योदरी देवी नवरात्र उत्सव (सप्तमी) व सोमवार दि.20 ऑक्टोंबर 2025 रोजी नरक चतुर्दशी अशा तीन सुट्टया जालना जिल्ह्यासाठी जाहिर करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


 

     जालना,दि.26 (जिमाका) :  प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्‌ह्यात दि. 27 व दि. 28 डिसेंबर 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला असून दि. 26 डिसेंबर 2024 रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

      तसेच दि. 27 डिसेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी  50 ते 60 कि.मी. प्र.ता. वेगाने) गारपीट होण्याची तसेच दि. 28 डिसेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 30 ते 40 कि.मी. प्र. ता.वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तर दि. 29 डिसेंबर 2024 रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली  असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

Tuesday, 24 December 2024

दैनंदिन व्यवहारासाठी डिजिटल व्यवहाराचा मोठ्या प्रमाणात वापर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 





     जालना,दि.24(जिमाका) : डिजिटल व्यवहार हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला असुन त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्व प्रकारचे व्यवहार सोपे झाले असतानाच याच तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकारही वाढले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती अपर्णा काटे, वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे-वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर, तहसिलदार श्रीमती छाया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी डॉ. पांचाळ पुढे म्हणाले की, आजचे युग हे डिजिटल युग असुन, वेळेची आणि पैशाची बचत करण्यासाठी प्रत्येक जण आज डिजिटल व्यवहाराचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. परंतू डिजिटल व्यवहार करतांना फसवणूकीचे प्रकार वाढल्याने प्रत्येकाने सतर्क राहणे देखील आवश्यक आहे. ऑनलाईन किंवा डिजिटल व्यवहार करतांना अनोळखी लिंक किंवा ओटीपी बाबत सावध भूमिका घेणे आवश्यक आहे. तसेच फसवणूक झाल्यास ऑनलाईन तक्रार देखील नोंदविणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकांना सुरक्षित डिजिटल व्यवहाराबद्दल जागरूकता देखील निर्माण करणे आवश्यक आहे.

 

श्रीमती अपर्णा काटे म्हणाल्या की, न्यायालयात लवकरच व्हर्च्युअल आभासी सुनावणी आणि ग्राहक न्यायासाठी डिजिटल सुविधा सुरु होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे या दोन्हीची बचत होणार आहे. व्हर्च्युअल सुनावणी सुरु होणार असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. ज्यामुळे या सुविधांचा सर्वांना वापर करणे सोयीचे होईल.

 

जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर प्रास्ताविकात म्हणाल्या की,  24 डिसेंबर, 1986 या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी मिळाल्याने दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणुन साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे प्रत्येक भारतीय ग्राहकाला हक्क प्राप्त झालेले आहेत.

            यावेळी कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

-*-*-*-*-*-

Monday, 23 December 2024

26 डिसेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन

 


     जालना दि. 23 (जिमाका) :-   हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  येथे जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे दि. 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या तंत्रप्रदर्शनामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील आयटीआय येथे शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण जॉब मॉडेलचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनामध्ये निवड झालेले जॉब मॉडेल पुढील विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवले जाणार आहेत.

           विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाविषयी आस्था निर्माण व्हावी व त्यांच्या कौशल्यात वाढ व्हावी तसेच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करावे या तंत्रप्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. तरी या तंत्रप्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या प्राचार्या रजनी शेळके यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

       जालना दि. 23 (जिमाका) :-   राष्ट्रीय  ग्राहक दिनानिमित्त Virtual Hearing & Digital Acces  to Consumer Justice  या विषयावर दि. 24 डिसेंबर 2024  रोजी दुपारी 1.00 वाजता ग्राहक जनजागृती बाबत महसुल भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 21 हजार लाभार्थ्यांना खात्यात थेट डी.बी.टी. मार्फत जमा होणार अनुदान लाभार्थ्यांना मोबाईल, आधार लिंक करण्याचे आवाहन


       जालना दि. 23 (जिमाका) :-   जालना शहर तालुक्यात संजय गांधी निराधार योजना  व श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन योजना या लाभार्थ्यांना डी.बी.टी. मार्फत त्यांचे खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर लिंक करावा. यासाठी बँक खात्याशी आधार लिंक करण्या संदर्भात सूचना दिल्या असून संजय गांधी शहर तहसिल कार्यालय येथे समक्ष लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे जमा करुन घ्यावी.

               निराधार व्यक्तींना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याअखेर ठराविक मानधन दिले जाते. यासाठी तहसिलदार यांच्यामार्फत यादी पाठवून त्यानुसार निधीचे वाटप केले जात होते. ती निधी बँकेकडून संबंधित लाभार्थींच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत  आहे. त्यामुळे या पुढे डी.बी.टी. मार्फत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा  होणार आहे.  त्यासाठी  या दोन्ही  योजनाचा लाभ घेत असलेल्या  पात्र निराधारांकडून बँक खात्याला आधार कार्ड, मोबाईल क्रमांक संलग्न करुन संकलित  करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे जालना शहरातील लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.  जे लाभार्थी सदर कागदपत्र या कार्यालयास सादर करणार नाही  त्यांचा लाभ बंद झाल्यास त्यासाठी लाभार्थी  स्वत: सर्वस्वी जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी. अशी माहिती तहसिलदार जालना छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  

-*-*-*-*-*-

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 31 जानेवरी 2025 पर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 


     जालना दि. 23 (जिमाका) :-  संजय गांधी निराधार योजना  व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या  लाभार्थ्यांनी दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत हयात प्रमाणपत्र, बँक पासबुकची छायांकित प्रत (कलर झेरॉक्स संपूर्ण नावाचे अद्यावत तीन नावाचे), उदा.  आशा रामराव कसबे याप्रमाणे मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक बँक खात्याला लिंक केल्याची पावती/ ई केवायसी पावती छायांकित प्रत, योजनेबाबत वर्गवारी पुराव्याची छायांकित प्रत अशी सर्व कागदपत्रे संजय गांधी योजना विभाग तहसिल कार्यालय, जालना येथे समक्ष सादर करण्याच्या सुचना दिल्या असून या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक दिल्यावरच सर्वांच्या बॅंक खात्यावर वेळेवर पैसे जमा करण्यात येतील. अशी माहिती तहसिलदार जालना छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  

-*-*-*-*-*-

 

Friday, 20 December 2024

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

  

     जालना दि. 20 (जिमाका) :-   जिल्ह्यात दि.25 डिसेंबर 2024  रोजी ख्रिसमस (नाताळ) साजरा होणार आहे. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना व आनंदोत्सव साजरा केला जातो. तसेच दि. 31 डिसेंबर 2024 हा वर्षाचा शेवटचा दिवस  तर दि. 1 जानेवरी 2025 रोजीचा दिवस हा नुतन वर्षाचे स्वागत म्हणुन साजरा केला जातो. या दिवशी जालना शहर व संपुर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येवून उत्साह साजरा करतात. नवीन वर्षाचे स्वागत म्हणुन विविध कार्यक्रम, नाचगाणे, डिजे वाजून डान्स करणे, फटाके फोडणे, रोषणाई करणे, हॉटेल व धाबे, शहरातील महत्वाच्या ठिकाणी पर्यटन स्थळे इत्यादी ठिकाणी लोकांचा जमाव एकत्र येवून विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येते. सदर कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरु असतो. तसेच दि. 31 डिसेंबर 2024 रोजी वर्ष अखेर व दि. 1 जानेवारी 2025 जानेवारी जयस्तंभ भिमा कोरेगाव शौर्यदिन निमित्ताने मानवंदना देण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात पुणे येथील जयस्तंभ भिमा कोरेगाव येथे जातात. सदर सण उत्सवाचे अनुषंगाने जालना शहरात व जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित होतात.

     तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस. टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने  जालना जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

     तसेच महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहेत. तसेच शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडून आत्मदहन,उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारतायेत नाही. 

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.

 

     हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.21 डिसेंबर 2024 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 4 जानेवारी 2025         रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-        

 

Tuesday, 17 December 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन

 


 

            जालना, दि.17 (जिमाका) :- राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्‍ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी व वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदीसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत 5 हजार 113 पात्र लाभार्थींना शासनाकडून प्रत्येकी 3 हजार रुपये आधार संलग्न बँक खात्यात रक्कम जमा केली आहे. तरी अशा लाभार्थ्यांनी शासन निर्णयातील नियमानुसार साहित्य, उपकरणे खरेदी करुन त्याचे देयक (पावती) सहायक आयुक्त समाजकल्याण जालना यांच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

अल्पसंख्याक हक्क दिनाचे आयोजन

  

 

            जालना, दि.17 (जिमाका) :-  अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणुन 18 डिसेंबर 2024 हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशिर हक्काची जाणीव, माहिती देण्यासाठी बुधवार दि.18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तरी नागरिकांनी अल्पसंख्याक हक्क दिन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

सैन्य दलातील अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी

 


            जालना दि.17 (जिमाका) :- भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची मोफत पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाकडून एसएसबी कोर्स क्र. 64 आयोजित करण्यात येणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील इच्छूक युवक-युवतींनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे गुरुवार दि. 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. संपुर्ण प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,  जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-