Thursday, 27 June 2024

संगणक शिकता शिकता कमवा योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणार प्रमाणपत्र

 


जालना, दि. 27 (जिमाका)-  छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सर सेनापती वीर पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत संगणक ज्ञानाच्या माध्यमातून जनतेची सहभागी विद्यार्थ्यांना विविध कामे करण्याचा (उदा अधार कार्ड काढणे, पॅन कार्ड काढणे इ.) उपक्रम राबविण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते शुक्रवार, दि.  28 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वा जिल्हाधिकारी कार्यालय  येथे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

Wednesday, 26 June 2024

कोतवाल पद भरतीसाठी 6 जुलै रोजी परिक्षा जालना शहरातील 14 परिक्षा केंद्रांवर होणार परिक्षा

 


 

            जालना, दि. 26 (जिमाका)- जालना जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यांतील कोतवाल संवर्गातील रिक्‍त पदे भरण्याकरीता सर्व तालुका निवड समितीकडून उक्‍त पदभरतीची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीद्वारे पूर्ण करण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी तथा  अध्‍यक्ष, तालुका कोतवाल निवड समिती यांच्‍या  सर्वानुमते सदर  परीक्षा ही  शनिवार, दिनांक 6 जुलै 2024 रोजी दुपारी 3.30 ते 5.00 या कालावधीत, जालना शहरातील 14 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्‍यात येणार आहे.

            यापूर्वी दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी कोतवाल पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे पदभरती रद्द करण्यात आली होती. आता कोतवाल पद भरतीसाठी ही परिक्षा 6 जुलै 2024 रोजी होणार आहे.

            सदर  पदभरती प्रक्रिया अत्‍यंत पारदर्शक व भयमुक्‍त वातावरणात पार पाडण्‍यासाठी दक्षता घेण्‍यात येत आहे. जालना शहरातील परीक्षा केंद्रांवर परीक्षेपुर्वी तसेच परीक्षेस बसल्‍यानंतर परीक्षार्थी यांची झडती / तपासणी करण्‍यात येणार असून त्‍यासाठी आवश्‍यक तो पोलीस बंदोबस्‍त उपलब्‍ध करुन देणेबाबत पोलीस प्रशासनास सुचित करण्‍यात आले आहे. परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही व वेबकास्टींक करणेबाबत नियोजन असून परीक्षेस येणा-या परीक्षार्थी यांची हॅण्‍डहेल्‍ड मेटल डिटेक्‍टरव्‍दारे तपासणी करण्‍यात येणार आहे. परीक्षार्थी यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षेच्‍या दिवशी दुपारी 1.30 वाजता उपस्थित राहवयाचे आहे. तसेच दुपारी 3.00 वाजेनंतर परीक्षा केंद्राचे मुख्‍य प्रवेशव्‍दार  बंद  करण्‍यात येणार असून त्‍यानंतर कोणत्‍याही प‍रीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही यांची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्‍यावी.

            परीक्षेचे हॉलटिकीट परीक्षार्थी यांना उपलब्‍ध  करुन देणेबाबत कळविण्‍यात आले असून त्‍यावर परीक्षार्थी यांना परीक्षेच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक त्‍या सूचना नमूद केल्‍या आहेत. सर्व परीक्षार्थी यांनी परीक्षेस येतांना ओळखीबाबतचा प्रवेशपत्रात नमूद एक पुरावा सोबत बाळगणे आवश्‍यक आहे. त्‍याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, याबाबत दक्षता घेण्‍यात यावी. सदर परीक्षेची प्राथमिक उत्‍तरतालिका त्‍याच दिवशी सध्‍यांकाळी 6.00 वाजता https://jalna.gov.in/Jalna.nic.in या जिल्‍हा संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करुन देण्‍यात  येणार आहे. परीक्षार्थी यांना दुस-या दिवशी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत संबंधित तहसिल कार्यालयात त्‍यावर आक्षेप सादर करता येईल. इतर ठिकाणी दाखल करण्‍यात आलेल्‍या आक्षेपांचा व तसेच मुदतीनंतर प्राप्‍त झालेल्‍या आक्षेपांचा विचार करण्‍यात येणार नाही.                          सदर परीक्षेची गुणवत्‍ता यादी दिनांक 7 जुलै 2024 रोजी निकाल प्रक्रिया पूर्ण होताच जाहिर करण्‍यात येईल याबाबत सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्‍यावी, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

 

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर उत्साहात संपन्न 1012 विद्यार्थी व पालकांनी शिबिरात नोंदविला सहभाग

 





            जालना, दि. 26 (जिमाका):-   इयत्ता दहावी व बारावी नंतर काय? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना भंडावून सोडते. भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्यातील विविध योजने संबधीमाहिती व रोजगाराच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती नसते. ही माहिती जालना  येथील चंदनझिरा परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.22 जुन 2024 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरात देण्यात आली.

     कौशल्य विकास , रोजगार,उद्योजकता  व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतुन सदरिल कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. सदरिल शिबीराचे उदघाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते झाले. या शिबिराच्या कार्यक्रमाला युवा नेतृत्व अक्षय गोरंट्याल, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ए.ए.केसकर, उद्योजक सुनिल रायठ्ठ्ठा, सहा.आयुक्त भुजंग रिठे  प्राचार्य डी.एम.राडोड, प्राचार्य पी.डी.उखळीकर, उपप्राचार्या श्रीमती रजनी शेळके, गटनिदेशक एस.एस.कापसे, एस.के.उपाध्ये, पी.डी.जुंजे, आर.एस.पुजारी  प्रमुख उपस्थित होते.

            शिबीरात आमदार कैलास गोरंट्याल व उद्योजक सुनिल रायठठ्ठा, यांनी जालना येथे मुलींची आय.टी.आय. सुरू करण्याचे आश्वासन दिले व सदर आयटीआय स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना  येथे दि. 22 जुन रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीराचे औचित्य साधून रोजगार व स्वयंरोजगारासाठी, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँक व वित्तीय संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्‍ह्यातील 1 हजार 12 विद्यार्थी व पालकांनी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  श्रीमती आर.एस.शेळके यांनी केले तर  सुत्रसंचालन वैशाली मोरे यांनी करुन आभार जी.एम.ढाकरे यांनी मानले.

-*-*-*-*-

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन उद्योजकांनी दंड व्याजाची रक्कम माफ करुन घेवून कर्जाची परतफेड करावी


 

जालना, दि. 26 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय जालना यांच्यामार्फत सन 1962 ते 1995 या कालावधीत मंडळामार्फत नॉर्मल व सीबीसी कर्ज ग्रामीण उद्योजकांना वाटप करण्यात आले होते. तसेच सन 1995 ते 2001 पर्यंत कन्सोर्टींय बँक फायनान्स या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले. परंतू परतफेड केलेली नाही अशा उद्योजकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून दंडव्याजाची रक्कम माफ करुन घेवून केवळ कर्जाची परतफेड करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय जालना यांच्यामार्फत विविध योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतू उद्योजकांची आर्थिक स्थिती व आधूनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे  उद्योग जागतिक स्पर्धेत टिकू शकले नाही. परिणामी उद्योजकांची  आर्थिक स्थिती हलाखीची  असल्यामुळे त्यांच्याकडून कर्ज वसूली वेळेत पुर्ण होवू शकली नाही तसेच काही उद्योजक मयत, परागंदा अन्य कारणामुळे  स्थलांतरीत झाल्याने कर्ज वसूली थकीत झालेली आहे. जिल्हा कार्यालयाकडून वारंवार कर्ज वसूलीच्या नोटीस पाठवून कर्ज भरणा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. परंतू अर्थसहाय्यांच्या योजनांना 50 वर्षा इतक्या दिर्घ कालावधी पुर्वीच्या आहेत. त्यांची एकरक्कमी वसूली होण्यासाठी मंडळाद्वारे थकीत मुद्दल व सरळव्याज, मार्जिन मनी एकरक्कमी भरणा केल्यास दंडव्याज माफ करण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन


 


           

 जालना, दि. 26 (जिमाका):-  थोर कल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  

-*-*-*-*-

शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच पिकांना खतांची मात्रा द्यावी

 


जालना, दि. 26 (जिमाका)-  जमीनेचे आरोग्य शाश्वत स्वरुपात जतन करण्याकरीता  शेतकरी बांधवानी माती परीक्षण करूनच आवश्यकतेनुसार पिकांना खतांची मात्रा दयावी व अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे, यांनी केले आहे.

पिक उत्पादनामध्ये सहभागी असणाऱ्या घटकामध्ये जमीन हा एक अत्यंत महत्वाचा नैसर्गिक घटक आहे. जमिनीची सुपीकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पिक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतात तथापि अलीकडील कालावधीत मात्र शेती व्यवसायातून महत्तम उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खताचा अवाजवी व असंतुलित  वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा आयोग्य वापर इत्यादीमुळे, जमिनीची आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे पिकाची खुरटलेली वाढ, उत्पादनाच्या गुणामध्ये घट, जमीन नापीक होणे, समस्याग्रस्त क्षेत्रामध्ये वाढ, उत्पादन क्षमतेमध्ये घट आदि बाबी निदर्शनास येत आहे.

आजमितीस व्यापारी तत्वावरील शेती करणे अपरिहार्य आहे. यासाठी शेती नियोजनमध्ये जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मृद व पाणी परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. माती परीक्षणामुळे शेत जमिनीचा प्रकार, तिचे भौतिक, रासायनिक, कायिक गुणधर्म, अन्नद्रव्याची उपलब्धता यानुसार जमिनीमध्ये हवा, पाणी यातील समतोल राखणे, क्षारता, चोपण, घट्टपणा इ. दोष दूर करणे, जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य तसेच पिकास आवश्यक  अन्नद्रव्य मात्रा याआधारे आवश्यक खत मात्राचा अवलंब करणे शक्य होते. त्यामुळे जमीनेचे आरोग्य शाश्वत स्वरुपात जतन करण्याकरिता सर्व  शेतकरी बांधवानी माती परीक्षण करूनच आवश्यकतेनुसार पिंकाना खतांची मात्रा दयावी व अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक याच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन श्री. कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

जालना येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत 28 जूनला शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

 


जालना, दि. 26 (जिमाका) – आयटीआयमध्ये (औद्यागिक प्रशिक्षण संस्था) अंतिम वर्षात शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी (स्थापत्य आरेखक या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी सोडून) जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (कार्यशाळा क्र. 2) येथे शुक्रवार दि. 28 जून 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनी धूत ट्रान्समिशन प्रा.लि. सहभाग घेणार आहे. तरी अंतिम वर्षात शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. या भरती मेळाव्यासाठी आयटीआयचे जे प्रशिक्षणार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला पात्र आहेत असे सर्व व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी (स्थापत्य आरेखक या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी सोडून)  सहभागी होऊ शकतात, असे अंशकालिन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दपत्रकाव्दारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

लाभार्थ्यांनो, आपले अपडेट आधार, बँकेत आधार लिंक असलेले खाते, मोबाईल क्रमांक जमा केला का? नसेल केला तर तलाठी/कोतवाल यांच्याकडे तात्काळ माहिती द्यावी निराधार योजना लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीमार्फत जमा होणार अनुदान 10 जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

 


 

      जालना, दि. 26 (जिमाका) –  शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमातAर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा वितरीत करावयाचे मानधन तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामार्फत बँकेला पाठवून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जात होते. मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्याचे वितरण हे डी.बी.टी. पोर्टलच्या माध्यमातुन निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे. त्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकात खेटे घालावे लागणार नाही. आता डी.बी.टी. पोर्टलद्वारे निराधारांचे अनुदान थेट बॅंक खात्यात मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबुन बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे.

            त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून खालील दिलेल्या कागदपत्रे संकलित करण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यांतील संजय गांधी योजना विभागांकडून सुरु करण्यात आलेली आहे. याबाबत गावस्तरावरुन तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.

          सर्व राज्य पुरस्कृत योजनेच्या लाभार्थी यांनी दि. 10 जुलै 2024 पर्यंत खालील कागदपत्रे जमा करावेत. यासाठी लाभार्थी  यांनी स्वत: तहसिल कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक नाही त्यामुळे स्वत: लाभार्थी यांनी तहसिल कार्यालयात येवून गर्दी न करता आपले गावातील तलाठी/कोतवाल यांचेमार्फत किंवा घरातील इतर सदस्यांमार्फत कागदपत्रे जमा करावीत.

पुढील कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे - अद्यावत आधारकार्ड (ई-आधार), हयात असलेले प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक, दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास), मृत्यू प्रमाणपत्र (विधवा लाभार्थ्यांसाठी), परित्यक्त्या/घटस्फोटीत/दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र. सदरील कागदपत्रे मुदतीत जमा करावे जेणेकरुन डी.बी.टी. पोर्टलद्वारे आपणांस नियमीत अनुदान वितरण करण्यात येईल. अधिक माहितीकरीता संबंधीत तहसिलदार/नायब तहसिलदार संगायो यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक अभिसरणाचा पाया रचला -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 






 

जालना, दि. 26 (जिमाका) – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले. त्यांनी केलेले शिक्षणविषयक कार्य महनीय आहे.  सामाजिक विषमता कमी करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी सामाजिक अभिसरणाचा पाया रचला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती (दि. 26 जून) दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने आज  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी बोलत होते.

कार्यक्रमास समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदिप भोगले, मुख्याध्यापिका सूर्यकला गोसावी, गृहपाल रघुनाथ खेडेकर, अप्पासाहेब होरशिळ, रामेश्वर कर्दळे, श्रीमती पाटोळे आदींसह कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मत्स्योदरी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा संघटक नशाबंदी मंडळाचे बिस्मिल्ला सय्यद यांनी अंमली पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करुन या विषयाचे पोस्टर्स कार्यक्रमात वाटप केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते  राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती धनादेशचे पल्लवी डोळसे, बोर्डे किरण या विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. मार्च-2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेत शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथील आर्यन गायकवाड, अदित्य कांबळे, यशराज शिंदे तसेच शासकीय निवासी शाळा, जालना येथील प्रज्ञा अरविंद सोनकांबळे, मिरा नवनाथ बोंडे, अरुणा गोवर्धन खरात व शासकीय निवासी शाळा, भोकरदन येथील जिवन सुरडकर, धम्मपाल सुरडकर व पवन मोरे या अनुक्रमे प्रथम, द्वितिय व तृतिय क्रमांक मिळावलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले. प्रस्ताविक अतिश ससाने यांनी तर सुत्रसंचालन डॉ. दिलीप गिरीले यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार गणेश अंबुरे यांनी मानले.

-*-*-*-*-*-*-

Monday, 24 June 2024

पालकमंत्री अतुल सावे 25 जून रोजी जालना दौऱ्यावर

 



जालना, दि. 24 (जिमाका) – राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे हे मंगळवार, दि. 25 जून 2024 रोजी जालना जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 8.30 वा. छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने जालनाकडे श्री. सावे प्रयाण करतील. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे त्यांचे आगमन होणार आहेत. सकाळी 10.00 वा. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सोयीनुसार ते छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

Tuesday, 18 June 2024

जालना जिल्हयातील ८७ हजार ८३१ शेतक-यांच्या खात्यात ९८.५० कोटी रक्कम जमा

 


जालना, दि. 18 (जिमाका) :- -जालना जिल्हयामध्ये माहे नोव्हेंबर व डिसेंबर, २०२३ या कालावधीत अवेळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानपोटी शासनाकडुन तालुका जाफ्राबाद, परतुर व घनसावंगी येथील २, ०७, २१० बाधीत शेतक-यांसाठी १९१.७६ कोटी रक्कम मंजुर करण्यात आलेली असुन ८५, ३४४ बाधीत शेतक-यांना ७२.२३ कोटी निधी यापुर्वीच वितरीत करण्यात आलेला आहे. परत शासनाकडुन दिनांक १७ जून २०२४ रोजी जिल्हयातील ३७, ६५२ शेतक- यांच्या खात्यात ४२.३२ कोटी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. व E-KYC प्रलंबित असलेल्या २५,९५० शेतकऱ्यांनी तात्काळ ई-महासेवा केंद्रावर जावुन EKYC करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतक-यांना करण्यात येत आहे.

 

तसेच दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शासनाकडुन तालुका जालना, बदनापुर, भोकरदन, मंठा व अंबड येथील ४,०७,२१८ बाधीत शेतक-यांसाठी ३८२.२१ कोटी रक्कम मंजुर करण्यात आलेली असुन २,२१,६३३ बाधीत शेतक-यांना २३७.३१ कोटी निधी यापुर्वीच वितरीत करण्यात आलेला आहे. परत शासनाकडुन दिनांक १७ जून २०२४ रोजी जिल्ह्यातील ५०,१७९ शेतक-यांच्या खात्यात ५५.१८ कोटी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. व EKYC प्रलंबित असलेल्या ३३,११३ शेतकऱ्यांनी तात्काळ ई-महासेवा केंद्रावर जावुन EKYC करावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतक-यांना करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday, 6 June 2024

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


जालना, दि. 6 (जिमाका)-  प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दिनांक 6 जून रोजी यलो अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिनांक 7 जून रोजी यलो अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 कि.मी.प्र.ता. वेगाने) मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, दिनांक 8 जून रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, दिनांक 9 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, दिनांक 10 जून रोजी यलो अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील तमाम नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किवा झाडांजवळ उभे राहु नये. बीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.  शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.  जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) सोहम वायाळ यांनी केले आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

  

जालना, दि. 6 (जिमाका) :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि.5 जुन 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष श्रीमती वर्षा मोहिते, मार्गदर्शक म्हणून पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश केसापूरकर, जिल्हा वकील  संघ अध्यक्ष ॲड विकास पिसुरे, सचिव प्रणिता भारसाकडे वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमास मुख्यालयी सर्व न्यायीक अधिकारी, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

पोस्टाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 10 जुन रोजी डाक अदालतीचे आयोजन

 


जालना, दि. 6 (जिमाका) :- भारतीय पोस्ट खात्यामध्ये सेवा देताना संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारीचा योग्य प्रकारे न्याय निवाड़ा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. तरी अशा तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी दि. 10 जुन 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील पोस्ट मास्तर जनरल या कार्यालयामधे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील पोस्टल सेवा ही सामाजिक आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अपरोक्षपणे डाकघराच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. डाक अदालतीमध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.

छत्रपती संभाजीनगर डाक विभागाअंतर्गत संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु / मनी ऑर्डर/ बचत बैंक खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.  संबधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार, प्रवर अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, - 431001 या नावे दोन प्रतीसह पाठवावी. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-