Friday, 24 May 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 लोकसभा उमेदवारांनी स्ट्राँगरुम उघडतेवेळी उपस्थित रहावे -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पांचाळ * मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज * मतमोजणी प्रतिनिधीं ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

 

             




 

जालना, दि. 24 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर जालना लोकसभा मतदार संघात सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवार दि.4 जुन 2024 रोजी सकाळी 8 वाजता मे सरस्वती ऑटो कम्पोनंट प्रायव्हेट लिमिटेड जालना येथे होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी स्ट्राँगरुम उघडतेवेळी मे सरस्वती ऑटो कम्पोनंट प्रायव्हेट लिमिटेड जालना या मतमोजणीच्या स्थळी सकाळी 7 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर मतमोजणी पुर्व तयारी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, लोकसभा मतदार संघातील मतमोजणी दि.4 जुन रोजी होणार असून सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेटची तर सकाळी 8.30 वाजेपासून ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात होईल. लोकसभा निवडणूकीत एकुण 26 उमेदवार होते तर एक नोटा बटन असे मिळून एकुण 6 विधानसभा मतदारसंघासाठी 94 टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. तर पोस्टल बॅलेटसाठी एकुण 11 टेबल असणार आहेत. मतमोजणीचा हॉल एकच राहणार असून बॅरिकेटस लावून प्रवेशद्वार वेगवेगळे राहील. तसेच कोणत्या टेबलवर कोणता कर्मचारी राहील याचे नियोजन सरमिसळ पध्दतीने निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार निवडणूक निरीक्षक त्याच दिवशी सकाळी करत असतात. असेही सांगितले. मतमोजणीच्या ठिकाणी वाहन, मोबाईल, डिजीटल उपकरणांना परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी प्रतिनिधींचे ओळखपत्र तयार करण्यासाठी छायाचित्र व आधारकार्डच्या छायांकित प्रतीसह अर्ज भरुन सादर करावेत. अशी सुचनाही  त्यांनी यावेळी केली.

पुर्णपणे दक्षता घेवून नियोजन करण्यात आले आहे. स्ट्राँगरुमच्या सुरक्षेसाठी डबल लॉक सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. असे सांगून स्ट्राँगरुमच्या सुरक्षाव्यवस्थेसह  सीसीटीव्ही फुटेजची काही दृश्यही त्यांनी संगणकाद्वारे उपस्थितांना दाखवत माहिती दिली. तसेच उमेदवार प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे, शंकेचे समाधानही त्यांनी यावेळी केले.

-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

Wednesday, 22 May 2024

निवृत्ती वेतनधारक/ कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन

 

   जालना दि. 22 (जिमाका) :- जालना जिल्हा कोषागाराचे अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना आवाहन करण्यात येते की, कोषागारामार्फत निवृत्तीवेनधारक यांना निवृत्तीवेतन/सुधारीत निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतनाविषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसूलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करुन संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सुचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केला जातो.

 

       याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त  झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.

 

         सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की, आपणास दुरध्वनी/भ्रमणध्वनी वरुन उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधुन रक्कम ऑनलाईन,गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. तरी कोणीही अशा दुरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये. याबाबत निवृत्ती वेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या दुरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापुर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन जालना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत जिल्हा कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांचेकडून करण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

 


            जालना दि. 22 (जिमाका) :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या  परीक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक 10 जुन 2024 ते  23 ऑगस्ट 2024 या कालावधीत CDS कोर्स क्र. 63 आयोजीत करण्यात येत आहे.  सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भेाजन आणि प्रशिक्षणाची  नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

      तरी, जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभागण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दिनांक 31 मे 2024 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे.  मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील  CDS- 63 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.  

     सदर सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवुन यावेत :-

  उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

  उमेदवार हा लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणा-या सी.डी.एस (CDS) या परिक्षेकरिता ऑनलाईन व्दारे अर्ज केलेला असावा.

    अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय. डी. – training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्रं. 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रं 9156073306 (प्रवेश पत्र मिळविण्यासाठी) असुन कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

Tuesday, 21 May 2024

निराधारांना अनुदान आता डीबीटी मार्फत मिळणार ! संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनाः बँकांचे खेटे बंद होणार अनुदान जमा झाल्यानंतर येणार मोबाईलवर मेसेज लाभार्थ्यांनो मोबाईल, आधार लिंक केला का? निराधार योजनाः लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीमार्फत जमा होणार अनुदान

   

      जालना, दि. 21  (जिमाका) :शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांअर्तंगत राबविण्यात येणा-या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ठराविक मानधन दरमहा अदा  केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसिल स्तरावरुन बँकेत पाठवून संबंधिताच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्याचे वितरण हे डी.बी.टी पोर्टलच्या माध्यमातून  निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे. 

      संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी तहसिलच्या संजय गांधी योजना विभागामार्फत संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानूसार निधी दिला जात होता, त्यानंतर तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रकियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकांत खेटे घालावे लागत होते. मात्र आता डी.बी.टी पोर्टल निराधारांचे अनुदान थेट बँक खात्यात मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबुन बँक कर्मचा-यांची कसरत थांबणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया जालना जिल्हयातील सर्व 8 तालुक्यांतील संजय गांधी योजना विभागाकडून सुरु करण्यात आलेली आहे. याबाबत गावस्तरावरुन तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.

      30 मे पर्यंत द्या कागदपत्रे, अन्यथा अनुदान अडकणार- संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 30 मे पर्यंत अदयावत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक (बँकेशी संलग्न असलेले) तलाठी यांच्याकडे देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक न देण्याच्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागेल.

ही द्यावी लागणार कागदपत्रे

     संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक        

आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत.

       संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योनजेच्या लाभार्थ्यांचे दरमहा मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. संबधीत योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसिल कार्यालयात उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 




जालना, दि. 21 :  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी  अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 22 मे रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर

 


    जालना, दि. 21 (जिमाका) – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे बुधवार, दि. 22 मे 2024 रोजी जालना जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. सकाळी 8.55 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून  जालनाकडे प्रयाण. सकाळी  10.00 वाजता सॅफरॉन हॉटेल, जालना येथे आगमन व राखीव. सकाळी  10.30 वाजता सॅफरॉन हॉटेल येथून गुरु गणेश तपोधाम,  जालनाकडे प्रयाण. सकाळी  10.35 वाजता गुरु गणेश तपोधाम येथे आगमन व आयोजित स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.25 वाजता गुरु गणेश तपोधाम येथून महेश भवन, मंठा रोड, जालनाकडे प्रयाण. दुपारी 12.30  वाजता महेश भवन, मंठा रोड, जालना येथे आगमन व आयोजित स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.25 वाजता महेश भवन  येथून चित्रकूट बंगला, भोकरदन रोड, जालनाकडे प्रयाण. दुपारी 1.35 वाजता चित्रकूट बंगला येथे आगमन व राखीव दुपारी  2.30 वाजता चित्रकूट बंगला, भोकरदन रोड, जालना येथून छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळकडे ते प्रयाण करतील.

                                        -*-*-*-*-*-*-

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष के. के. तातेड यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

      जालना, दि. 21 (जिमाका)   महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष श्री. के. के. तातेड हे बुधवार, दि. 22  मे 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. दु.1.00 वा.मुंबई येथुन जालनाकडे प्रयाण (रस्ते मार्गाने). सायं 7.00 वा जालना येथे आगमन व राखीव.

-*-*-*-*-*-

Thursday, 16 May 2024

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत 18 मे रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर

 

     जालना, दि. 16 (जिमाका) – गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे शनिवार, दि. 18 मे 2024 रोजी  जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 18 मे रोजी  सकाळी 9.00 वाजता 21, फोर्टी ग्रिन्स, इटखेडा, छत्रपती संभाजीनगर येथून कारने गुरु गणेश तपोधाम, जालनाकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता गुरु गणेश  तपोधाम,  जालना येथे आगमन. सकाळी 10.00  ते 11.00 या कालावधीत ते गुरु गणेश तपोधाम येथे आचार्य महाश्रमणजी दिक्षा कल्याण महोत्सवामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती राहणार आहेत. सकाळी 11.00 वाजता गुरु गणेश तपोधाम, जालना येथुन कारने 21, फोर्टी ग्रिन्स इटखेडा, छत्रपती संभाजीनगरकडे ते प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-*-

Tuesday, 14 May 2024

जालना लोकसभा मतदारसंघात 69.18 टक्के मतदान

 

जालना, दि. 14 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी उत्साहात मतदान पार पडले. एकूण  69.18 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांना प्रतिसाद देत प्रशासनाच्या आवाहनाला दाद देऊन मतदारांनी उर्त्स्फूतपणे मतदान केले.

सोमवार, दिनांक 13 मे 2024 रोजी जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. जालना लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. 

जालना- एकूण मतदार संख्या  पुरुष 1,73,975, महिला 1,54,222 व इतर 35 असे एकूण 3,28,232 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या पुरुष 1,09,103, महिला 90,777 व इतर 6 असे एकूण 1,99,886 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 62.71 टक्के, महिला 58.86 टक्के व इतर 17.14 टक्के अशा एकूण 60.90 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

बदनापूर- एकूण मतदार संख्या  पुरुष 1,68,340, महिला 1,53,548 व इतर 5 असे एकूण 3,21,893 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,25,012, महिला 1,06,135 व इतर 1 असे एकूण 2,31,148 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 74.26 टक्के, महिला 69.12 टक्के व इतर 20 टक्के असे एकूण 71.81 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

भोकरदन –एकूण मतदार संख्या पुरुष 1,62,987, महिला 1,49,038 व इतर 0 असे एकूण 3,12,025 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,23,516, महिला 1,08,176 व इतर 0 असे एकूण 2,31,692 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 75.78 टक्के, महिला 72.58 टक्के व इतर 0 टक्के असे एकूण 74.25 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

सिल्लोड - एकूण मतदार संख्या पुरुष 1,79,017, महिला 1,60,826 व इतर 4 असे एकूण 3,39,847 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,25,929, महिला 1,08,108 व इतर 2 असे एकूण 2,34,039 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 70.34 टक्के, महिला 67.22 टक्के व इतर 50 टक्के असे एकूण 68.87 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

फुलंब्री - एकूण मतदार संख्या पुरुष 1,84,985, महिला 1,66,819 व इतर 4 असे एकूण 3,51,808 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,31,188, महिला 1,10,860 व इतर 1 असे एकूण 2,42,049 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 70.92 टक्के, महिला 66.46 टक्के व इतर 25 टक्के असे एकूण 68.80 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

पैठण - एकूण मतदार संख्या पुरुष 1,64,802, महिला 1,48,963 व इतर 4 असे एकूण 3,13,769 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,21,127, महिला 1,01,278 व इतर 1 असे एकूण 2,22,406 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 73.50 टक्के, महिला 67.99 टक्के व इतर 25 टक्के असे एकूण 70.88 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

-*-*-*-*-